Wednesday, 2 November 2011

? ? ?


कॉलेजचं शेवटचं वर्ष. कॉलेजच्या आसपास, फूटपाथवर राहणाऱ्या मुलांना एकत्र करून आम्ही शिकवायचो. त्यांच्याबरोबर खेळायचो, फिरायला घेऊन जायचो, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन साजरे करायचो, सांताक्लॉजला बोलवून ख्रिसमस पार्टीही करायचो.......... कॉलेजच्या पलिकडे आपण काहीतरी वेगळं करतोय (‘समाजात योगदान’ वगैरे) असं वाटायचं. पण अगदी खरं खरं सांगायचं तर खूप मजा यायची हे सगळं करताना..... एवढंच खरं होतं.
तुटपुंज्या एका वर्षाच्या जीवावर मनात इमले रचत एक दिवस जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचलो तेव्हा कळलं आमच्या इमल्यांचा पाया असलेली आमची मुलं कॉलेजच्या आसपासचा भाग सोडून निघून गेलीयेत. त्यांना पोलिसांनी हाकलून दिलंय. पेपरमधली बातमीही हातात पडली. आमचं कॉलेज व आसपासच्या रहिवाशांनी, दुकानदारांनी मिळून या मुलांवर व त्यांच्या कुटुंबियांवर ते बांग्लादेशी असल्याचा आरोप केला होता. पाठोपाठ एका रहिवाशाकडून ‘निमंत्रण’ही मिळालं. भेटलो. त्यांनी आमचा project बंद करायला सांगितलं ....... खरं तर धमकावलंच. बरीच वादावादी, चर्चा, आरोप झाले. आमच्या तोंडून होकार निघेना. त्या काकांनी फक्त पिस्तुलच बाहेर काढायचं बाकी ठेवलं. आम्ही निघताना ते काका म्हणाले, “देशद्रोही हो तुम लोग.”........................ देशद्रोही ???!!! ........................ मनातल्या कोसळलेल्या इमल्याची वाळू गोळा करत बाहेर पडलो.
मुलांना गाठून त्यांच्याशी बोलताना कळलं त्यांचे आई-वडील कर्नाटक, आंध्रमधील वेगवेगळ्या गावांमधून मुंबईत आले. पण त्यांच्यातल्या मोठ्यांशी बोलताना लक्षात आलं की शक्यता अशी आहे की, अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या आधीची तिसरी-चौथी पिढी बांग्लादेशमधली असू शकेल जी भारतात बेकायदेशीररित्या स्थलांतरित झाली. भारताचं नागरिकत्व मिळवण्याचे जे काही पर्याय आहेत त्यातील एक म्हणजे by birth तुम्ही भारतीय असू शकता. त्या दृष्टीने आमची मुलं भारतीयच होती. आता वादच घालायचे झाले तर मुलं भारतीय आहेत हे सिद्ध करणं फारसं कठीण नव्हतं. सुटकेचा निश्वास टाकला आणि घरी निघालो.
पण मनातला गोंधळ नाहीच कमी झाला. त्या दिवशीचा ट्रेनमधला प्रवास नि:शब्द झाला; पण मनात शब्दांचं वादळ होतं. वादळात सापडलेले, सुटेसुटे झालेले, अस्पष्ट, असुसंगत (विसंगत नाही), इकडे-तिकडे भेलकांडणारे, स्वत:चाच अर्थ शोधणारे शब्द................. खरंच देशद्रोह केला होता आम्ही? ........... नेमकं काय मोठं असतं? ...................... राष्ट्रवाद की मानवतावाद? गेली अनेक दशकं बेकायदेशीररित्या बांग्लादेशी मोठ्या संख्येने भारतात स्थलांतरित होतायत. भारत सर्वसामान्यांच्या गरजा भागवताना हा अतिरिक्त भार वाहतोय. आता त्यांची दुसरी-तिसरी-चौथी पिढी इथे (भारतात) जन्म घेत्ये. ह्या पुढच्या पिढ्या भारतीयच ठरतात आणि भारत अशा लाखो बांग्लादेशींची बेकायदेशीर स्थलांतरितं नाईलाजाने पचवतो. गेली अनेक दशकं बांग्लादेशींचे लोंढे भारतात येतायत. आसाममध्ये या प्रश्नाने इतकं उग्र रूप धारण केलंय की तिथे आंदोलनं होतायत. पण मग म्हणजे अशा पार्श्वभूमीच्या मुलांना शिकवणं हा खरंच देशद्रोहच झाला की? खरंच झाला का? कायदा काय सांगतो हे मला ऐकायचं नव्हतं. कायद्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं; पण माझ्या मनातला प्रश्न ‘सुटला’ नसता.
समोर आलेल्या दोन वंचितांना मदत करताना जसं अजूनही दुर्दैवाने काहीजण जात-पात विचारतात तशी मी nationality विचारली पाहिजे का? भारतीय, बांग्लादेशी अशा नवीन ‘जाती’ जन्माला घालण्यापलिकडे यातून काय साधेल? मग मी ‘माणूस’ म्हणून त्यांच्याकडे कधी पाहायचं? वेळ मिळेल तेव्हा? फुरसतीत? एखाद्याला मदत करताना त्याची जात-पात, धर्म, पंथ, वेश, भाषा कसलाही विचार करू नये म्हणतात..... मग nationality? हा बॅलन्स साधायचा कसा? कसे ठरवणार याचे प्राधान्यक्रम? Ravindranath Tagore was a citizen of the world............. हे कौतुक आहे की टीका?
दोन भुकेल्या माणसांच्या अन्नाची कायमची सोय लावताना मी जर त्यातल्या बांग्लादेशीलाही मदत करणार असेन तर मग मी त्याला इथेच (भारतात) राहायला प्रेरित करून माझ्या देशावरचा भार खरंच वाढवणार आहे का?
खरंच काय मोठं असतं?............... राष्ट्रवाद की मानवतावाद?