Wednesday, 3 August 2011

बाटली


अभ्यासिकेतून घरी परत निघाले तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. उरलंसुरलं पाणी पिऊन रिकामी झालेली पाण्याची बाटली हातात नाचवत मी सायकलकडे निघाले. रिकामी असल्यामुळे हातातून खाली पडल्यावर, खांबावर आपटताना बाटलीचा मोठा आवाज व्हायचा. रात्रीच्या शांततेत तो आवाज आणखीनच मोठ्ठा वाटत होता. सायकलच्या दिशेने जाताना मी दुरूनच बाटली सायकलच्या बास्केटमध्ये टाकली. ती घरंगळत, गडगडत बरोब्बर त्यात विसावली.
रस्त्यावरून जाताना खड्ड्यांमुळे (बास्केटही सैल झालं होतंच) बाटलीचा जोर आणखीनच वाढला. एकटीच होती बास्केटमध्ये. हवी तशी बागडत होती. मग मात्र तिला उचलून थेट घरी नेऊन खिडकीच्या कोपऱ्यात ठेवून दिलं आणि शांत राहण्याबद्दल दटावलं तर खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने रात्री माझ्याच अंगावर पडून झोपेत तिनं दचकवलंच मला.
पहाटे उठले, आवरलं. बाटली स्वच्छ धुवून काढली. विसळून, खळबळवून घेऊन तिच्यात पाणी भरलं.......... सायकलवर टांग मारून निघाले.
बाहेर अजूनही शांतताच होती. रस्त्यावर खड्डे आत्ताही होतेच, अभ्यासिकेत पोहोचल्यावर गार वारं खायच्या इच्छेने मी खिडकीही उघडी टाकली होती. पण या सगळ्यात रात्रीचा खडखडाट कुठेच नव्हता....................... बाटली आता शांत, तृप्त........... स्थिर झाली होती.