Monday 19 September 2011

मला एकदा...


मला एकदा हत्ती होऊन पहायचंय
वाटेवरून चालताना
मधे येणाऱ्या अडथळ्यांना
सहजपणे चिरडत पुढे जायचंय
सूपाएवढ्या कानांनी दूरवरचं ऐकत
आणि छोट्याछोट्या डोळ्यांनी
बारकाईने निरीक्षण करत
रानोमाळ भटकायचंय
मला एकदा हत्ती होऊन पहायचंय.

मला एकदा सिंह होऊन पहायचंय
जंगलची सगळी जबाबदारी
आयाळीवर असताना
गंभीर चेहऱ्याने चिंतन करत बसायचंय
वाटेवरून चालताना मधेच थांबून सिंहावलोकन करायचंय
मला एकदा सिंह होऊन पहायचंय.

मला एकदा मुंगी होऊन पहायचंय
दिवस, रात्र, ऊन, पाऊस काही असो
पिटपिट पिटपिट करत कामाचे डोंगर उपसणाऱ्या
शिस्तबद्ध, नेटक्या teamचं member व्हायचंय
अपघात झालेल्या हत्तीला वाचवायला
रक्त देण्यासाठी रक्तपेढीकडे धावण्याइतका
आत्मविश्वास आणि मोठ्ठ मन मला मिळवायचंय
मला एकदा मुंगी होऊन पहायचंय.

मला एकदा अणू होऊन पहायचंय
अतिसूक्ष्म होऊन एखाद्या गोष्टीच्या
अंतरंगात डोकवायचंय
एखाद्या वैभवशाली गोष्टीचा
छोटासा भाग होऊन राहायचंय
विनाशकारी अणूशृंखलेतील अणूशी
bond बांधणं नाकारायचंय
मला एकदा अणू होऊन पहायचंय.